सातारा निसर्ग सौंदर्याने नटला, प्रसिद्ध धबधब्यांचं विहंगम दृश्य, Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!
Satara Waterfalls : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेल्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात एकीव धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. पावसाची उघड झाप होत असल्यामुळे या कास रोड वरील धबधब्यात भिजण्याची मजा घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील धबधब्यांचे फोटो पाहूयात.

सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे. या धबधब्याचे पाणी हे तीन टप्प्यात जमिनीवर पडत असून हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो. सध्या कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे याच्या सांडव्यावरुन पडणारया पाण्यापासुन पुढे 5 किलोमीटर या धबधब्याचे विहंगम दृष्य पहायला मिळते. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

साताऱ्याच्या जवळ असणारा प्रसिद्ध ठोसेघर धबधबा देखील ओसंडून वाहत आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर याच धबधब्याचं अनोखे मनमोहक रूप पर्यटकांना आकर्षित करत असते. ठोसेघर येथील दोन्हीही धबधबे आहेत ते दरी कपारीतून कोसळू लागल्यामुळे शनिवार रविवार पर्यटक हे धबधबे पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत.

महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, या मुसळधार पावसामुळे निसर्गाने अक्षरशः हिरवागार शालू चढवला आहे. महाबळेश्वर मधील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आता रौद्ररूपात ओसंडून वाहू लागला असून, त्याचे मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे..धुक्याची दाट चादर, सोसाट्याचा वारा आणि कोसळणारा धबधबा... या रम्य वातावरणामुळे लिंगमळा परिसराला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे.

साताराच्या परळी खोऱ्यात असणाऱ्या केळवली धबधब्याचे मनमोहक दृश्य सध्या पर्यटकांना आकर्षित करताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापूर्वी पडलेल्या पावसानंतर केळवली धबधबा देखील ओसंडून वाहू लागला आहे यामुळे पर्यटक या धबधब्याला आवर्जून भेट देताना पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात धबधबे प्रवाहित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने प्रशासनाने धबधब्यांकडे जाणाऱ्या रस्ते हे धोकादायक आणि निसरडे बनल्यामुळे काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.