Sarfaraz Khan : ‘परफॉर्मन्सच्या पलीकडे काहीतरी कारण आहे’ सरफराझ खानला सतत डावलण्यावर पहिल्यांदाच वसीम जाफर स्पष्टपणे बोलले
Sarfaraz Khan : "आमच्यावेळी रणजी ट्रॉफी सर्वकाही होतं. त्यावेळी आयपीएल नव्हतं. रणजी ट्रॉफी मध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली, तर तुम्हाला दुलीप ट्रॉफीमध्ये संधी मिळायची. त्यानंतर इंडिया ए चे दरवाचे तुमच्यासाठी उघडले जायचे"

देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतकं दमदार प्रदर्शन करुन सरफराझ खानची टीम इंडियात निवड का होत नाहीय? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. सरफराझने शेवटच्या रणजी सामन्यात हिमाचल प्रदेश विरुद्ध 154 धावा फटकावल्या होत्या. 96 फर्स्ट क्लास इनिंग्समध्ये त्याने 18 सेंच्युरी झळकवल्या आहेत. 70.67 त्याची फर्स्ट क्लास क्रिकेटमधली सरासरी आहे. इतका चांगला परफॉर्मन्स असून सुद्धा टीम इंडियात जेव्हा निवडीचा विषय येतो, तेव्हा सरफराझ खान निवडकर्त्यांना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टेस्ट सीरीज झाली. त्यावेळी साई सुदर्शन जखमी झाल्यानंतर त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून सरफराझ खानला बोलवण्यात आलेलं. पण त्याचा प्लेइंग इलेवनमध्ये समावेश केला नाही. 2024 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सरफराझ खान शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भारतासाठी खेळलेल्या सहा कसोटी सामन्यात त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकवली. 37.10 त्याची सरासरी आहे. सरफराजकडे आकडे असूनही त्याचं टीममध्ये सिलेक्शन होत नाही, याचं माजी क्रिकेटर वसीम जाफर यांनाही आश्चर्य वाटतं.
“आमच्यावेळी रणजी ट्रॉफी सर्वकाही होतं. त्यावेळी आयपीएल नव्हतं. रणजी ट्रॉफी मध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली, तर तुम्हाला दुलीप ट्रॉफीमध्ये संधी मिळायची. त्यानंतर इंडिया ए चे दरवाचे तुमच्यासाठी उघडले जायचे. हा त्यावेळचा राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचण्याचा मार्ग होता. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. आयपीएलला आता महत्व आहे. खेळाडू आणि सिलेक्टर आता आयपीएलकडे लक्ष देतात. आपण पाहिलय की, अनेक खेळाडू आयपीएलमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेत” असं वसीम जाफर त्यांच्या युट्यूब चॅनलवर म्हणाले.
मला त्यामागचं कारण माहित नाही
“रिंकू सिंह आणि तिलक वर्मा दोघेही तिन्ही फॉर्मेटचे प्लेयर आहेत. सरफराझ खान बद्दल मी पुन्हा म्हणीन की, काहीतरी आहे. त्याला सिलेक्ट करायचं नाहीय असं मला वाटतं. त्याचं प्रदर्शन सर्वांसमोर आहे. त्याने त्याच्या शेवटच्या रणजी ट्रॉफी सामन्यातही शतक झळकवलेलं. इतक्या छोट्या करिअरमध्ये त्याच्या नावावर 18 सेंच्युरी आहेत. मला वाटतं की, त्यांना सरफराझला निवडायचं नाहीय. मला त्यामागचं कारण माहित नाही. पण प्रदर्शन आणि क्रिकेट पलीकडे काहीतरी कारण आहे असं मला वाटतं” असं वसीम जाफर म्हणाले.
हे दुर्देवी आहे
“सरफराझने किती धावा करुं दे, त्याची सरासरी कितीही असो, पण त्यांना सरफराझला निवडायच नाहीय असचं मला वाटतं. त्याशिवाय दुसरं काही कारण मला वाटतं नाही. हे दुर्देवी आहे. पण जे आहे ते आहे” असं वसीम जाफर म्हणाले.
