Sayali Sanjeev: आडनावाऐवजी का लावते वडिलांचं नाव? सायली संजीवने पहिल्यांदाच सांगितलं खास कारण
Sayali Sanjeev: सायलीच्या या खुलाशानंतर तिच्या चाहत्यांना तिच्या नावामागील भावनिक कारण समजलं आहे. एका अभिनेत्रीच्या नावामागे प्रसिद्धी किंवा ग्लॅमर नसून एका खास व्यक्तीप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञतेची भावना आहे, हे तिच्या निर्णयातून दिसून येतं.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. 'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या सायलीने 'झिम्मा', 'गोष्ट एका पैठणीची', 'ओले आले' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, तिच्या अभिनयाइतकीच तिच्या नावाची आणि आडनावाचीही अनेकदा चर्चा होत असते. सायली आपल्या नावापुढे वडिलांचं नाव लावते, पण स्वतःचं मूळ आडनाव का लावत नाही, असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतो.
आता अभिनेत्रीने स्वतः यामागचं कारण सांगितलं आहे. तिच्या या खुलाशामुळे चाहत्यांना तिच्या नावामागची भावनिक गोष्ट समजली आहे. सायली संजीवचं पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर असं आहे. तिचं मूळ आडनाव चांदसरकर आहे. मात्र, ती मनोरंजनविश्वात सायली संजीव याच नावाने ओळखली जाते. धुळे इथं जन्मलेल्या आणि नाशिकमध्ये शिक्षण घेतलेल्या सायलीने आपल्या नावापुढे आडनावाऐवजी वडिलांचं नाव लावण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे हा निर्णय तिने चित्रपटसृष्टीत येण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी घेतलेला नव्हता. सायलीने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, 'मी या क्षेत्रात येण्यापूर्वीच माझं नाव बदललं होतं. सिनेइंडस्ट्रीसाठी मी नाव बदललेलं नाही. प्रत्येकाला नावासोबत आडनाव पुकारण्याची सवय असते. माझी अशी इच्छा होती की, मला आडनावाने जरी बोलवायचं असेल, तर ते माझ्या वडिलांचं नाव असावं. माझं ते स्वप्न पूर्ण झालं.'
पुढे ती म्हणाली की, तिच्या काही चित्रपटांच्या पुरस्कारांवरही सायली संजीव असंच नाव लिहून येतं. त्यामुळे वडिलांसाठी काहीतरी करू शकले, त्यांच्यासाठी केलेली ही एक छोटीशी गोष्ट आहे, अशी भावना तिच्या मनात आहे. मराठी सिनेयुगला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला.
सायलीचे वडील संजीव चांदसरकर यांच्याशी तिचं खूप जवळचं नातं होतं. वडिलांचं नाव कायम आपल्यासोबत असावं, या भावनेतून तिने हा निर्णय घेतला होता. 2021 मध्ये कर्करोगाशी झुंज देताना तिच्या वडिलांचं निधन झालं. मात्र, त्यांच्या आठवणी आजही सायलीने जपल्या आहेत.