
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या विळख्यात लाखो सेलेब्रिटी अडकले आहेत. नुकतंच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते सूरज थापर (Sooraj Thapar) यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सूरज थापर यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र गोव्याहून शूटींगवरुन मुंबईला परतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानतंर त्वरित त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व चित्रपट, मालिकांच्या शूटींग बंद करण्यात आल्या आहेत. सूरज थापर हे स्टार प्लसवरील शौर्य एक अनोखी कहानी या मालिकेत भूमिका करत आहे. या मालिकेच्या शूटींगसाठी ते नेहमी मुंबई ते गोवा असा प्रवास करत होते.

याच दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून त्यांना ताप येत होता. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मुंबईत आल्यानंतर त्यांचा ताप वाढला. तसेच ऑक्सिजनची पातळीही घसरली. यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नाही. सूरज थापर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांच्या बहिणीने केले आहे.

सूरज थापर हे छोट्या पड्यावरील फार प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘ससुराल गेंदा फूल’, ‘एक नई पहचान’ ‘ छल-शह आणि मात’ यासारख्या मालिकेत काम केले आहे.