
महाराष्ट्राच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध नापणे धबधबा आता पर्यटकांना एका अनोख्या अनुभवाची पर्वणी देणार आहे. या बारमाही वाहणाऱ्या धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे.

हा पूल पर्यटकांचे नवे आकर्षण केंद्र बनला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या धबधब्याच्या विलोभनीय दृश्यात हा पूल भर घालत आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात प्रवेश करताना वैभववाडी तालुका हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. या जिल्ह्यात येणारा कोणताही पर्यटक नापणे धबधब्याला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही, असे म्हटले जाते.

दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी येतात. नापणे धबधब्याचे सौंदर्य खरोखरच मनमोहक आहे. धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली हिरवीगार झाडी, उंचावरून खोल डोहात कोसळणारे धबधब्याचे फेसाळणारे पांढरेशुभ्र पाणी आणि विविध पक्षांचा किलबिलाट असे विलोभनीय नैसर्गिक दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

उन्हाळ्यात पर्यटक कुटुंबासोबत नदीत उतरून धबधब्याचा आनंद घेतात. मात्र, पावसाळ्यात नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने धबधबा रौद्र रूप धारण करतो, ज्यामुळे पर्यटकांना लांबूनच त्याचे दर्शन घ्यावे लागते.

पण आता या काचेच्या पुलामुळे पर्यटकांना जवळून धबधब्याचा अनुभव घेता येत आहे. या पुलाला कमानी पद्धतीचे रंगीत कुंपण लावण्यात आले आहे. या पुलावरून मुख्य धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहता येणार आहे.

मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेले लहान धबधबे देखील पाहता येत आहेत. यामुळे पावसाळ्यातही पर्यटकांना आता धबधब्याचा जवळून अनुभव घेता येत आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच काचेचा पूल ठरला आहे.

नापणे धबधबा कोल्हापूर-तरळे राष्ट्रीय महामार्गावरील नाधवडे गावापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे. तसेच, वैभववाडी रेल्वे स्टेशनपासून हा धबधबा केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे, ज्यामुळे येथे पोहोचणे खूपच सोपे आहे.