
छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'बद्द माहीत नाही, तो कार्यक्रम पाहिला नाही, असा प्रेक्षक विरळाच. 2008 च्या सुमारासच्या कार्यक्रमात छोट्या गायकांनी अगदी धमाल केली होती. पण तरीही त्यात शेवटी उरलेले ते 5 लिटील चॅम्प्स.. मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर. सर्वांचाच आवाज उत्तर, कार्तिकी तर विजेतीही झाली. पण याच शोने पुढे आलेली, सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आज मराठी इंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय आवाज आहे. ( Photos : Social Media)

अनेक मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटातील गाणी फक्त मराठीच नव्हे तर इतर भाषेतही आपल्या गोड गळ्याचा ठसा उमटवणाऱ्या आर्याचे हजारो चाहते आहेत. आज ती इतकी प्रसिद्ध आहे, पण तिला खरी ओळख मिळवून 'लिटिल चॅम्प्स'नेच. ती विजेती ठरावी अशी अनेकांची इच्छा होती, मात्र कार्तिकीने बाजी मारली, असं असलं तरी आर्याचा गायनाचा प्रवास अविरत सुरूच राहिला आणि आज ती आघाडीची गायिका आहे.

आर्याचं 'लिटिल चॅम्प्स'चं विजेतेपद हुकल्यामुळे अनेकांना वाईट वाटलं, काही जण नाराज झाले. पण या सर्वांबद्दल आर्याल काय वाटलं, तिची प्रतिक्रिया कशी होती ? याबद्दल ती स्वत:च बोलली आहे. एका मुलाखतीत तिला याबद्दल विचारण्यात आलं होतं. अंतिम फेरीत तुम्ही 5 जण होता, पण शेवटी विजेती म्हणून तुझं नाव जाहीर झालं नाही, तेव्हा कसं वाटलं, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने अगदी मोकळेपणाने उत्तर दिलं.

खरं सांगू तर ग्रँड फिनालेचा आमचा एक मजेशीर किस्सा आहे. मी आणि प्रथमेश (लघाटे) यांच्यात अंतर्गत स्पर्धा होती, की बघूया ही स्पर्धा कोण जिंकतं, तू की मी ? आत्ता हे सांगणं किती योग्य आहे ते मला माहीत नाही पण स्पर्धेच्या दिवशी अंतिम निकाल हा खळेकाकांनी जाहीर केला. तेव्हा ते ज्या खुर्चीवर बसले होते, त्यांच्या एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश, असे आम्ही उभे होते. खळेकाकांनी जेव्हा ती चिठ्ठी उघडली , तेव्हाचा आम्हाला त्यातलं विजेत्याचं नावं दिसलं होतं.

कार्तिकीचं नाव होतं ते, ते पाहून मी आणि प्रथमेश दोघेही खुश झालो. की चल, तूही जिंकला नाहीस आणि मीपण जिंकले नाही. इतकंच डोकं होतं आम्हाला तेव्हा. विजेता कोण आणि उपविजेता कोण, यात फरक असतो तेही माहीत नव्हतं असं आर्या म्हणाली. पुढे तिने आणखी एक किस्सा सांगितला, की रोहित तर कार्तिकीला म्हणाला सुद्धा होता, की तुझ्या ट्रॉफीवर विजेता असं लिहिलं आहे आणि माझ्या ट्रॉफीवर उपविजेता लिहिलंय. त्यावरचं उप खोडलं तर मग मीपण विजेता होतो की.. अगदी असाच आमचा (त्य़ाकडे पाहण्याचा) दृष्टिकोन होता, असं आर्या म्हणाली.