
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर फॅशनिस्टसुद्धा आहे. तिला वेगवेगळ्या पद्धतीचे, फॅशनचे आउटफिट परिधान करायला आवडतात. अनेकदा सोनम तिच्या अतरंगी आउटफिटमुळे चर्चेत राहिली आहे.

आताही सोनम कपूर तिच्या कपड्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त हटके ड्रेसमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सोनमने माती आणि खादीचा ड्रेस परिधान केला आहे. होय, कर्नाटकमधील लाल आणि मुलतानी मातीपासून बनवलेली चोळी घातली असून आणि खादीचा लेहंगा व ओढणी त्यावर घेतली आहे. दिवाळीसाठी सोनमने हा खास लूक केला आहे.

सोशल मीडियावर सोनमने तिचे काही फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे "हे आऊटफीट कर्नाटकमधील लाल आणि मुलतानी मातीपासून बनवलेला आहे. त्याबरोबरच लेहेंगा आणि ओढणी ही खादीची आहे. हा पोशाख भूमीशी असलेले आपले संबंध दाखवून देतो."

पुढे ती म्हणाली आहे. "जिथून आपण आलो आहोत, ती आंतरिक शक्ती आणि अभिमान जागृत करणारा हा पोशाख आहे. या पोशाखाचे महत्त्व खूप आहे.या दिवाळीला आपल्या परंपरा आणि मूळांशी अशा प्रकारे स्वत:ला जोडता आले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे", असे म्हणत सोनमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर सोनम कपूरच्या या पोशाखाची चर्चा खूपच रंगली आहे. अनेकांनी तिच्या या हटके लूक आणि पोशाखाचे कौतुक केले आहे. ती या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.