
भारत श्रीलंका यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना सुरु आहे. हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण श्रीलंकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना गमावला तर भारतीय संघ 27 वर्षानंतर मालिका गमवणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकलेला नाही. रोहित शर्माने पहिल्या दोन वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहलीची बॅट काय चालली नाही. याचा परिणाम आयसीसी क्रमवारीत दिसून आला आहे.

कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दोन वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली आणि तिसरं स्थान गाठलं आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला. रोहित शर्माचे गुण या मालिकेपूर्वी 746 इतके होते. यात आता वाढ झाली असून 763 झाले आहेत.

विराट कोहलीचं या मालिकेतील कामगिरीमुळे नुकसान झालं आहे. विराट कोहलीला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे गुण 768 होते आणि त्यात घट होत 752 झाले आहेत.

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अजूनही पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. त्याचे 824 गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर शुबमन गिल आहे. त्याचे गुण 782 इतके आहेत. या मालिकेपूर्वी त्याचे गुण 801 होते. पण मालिकेत हवी तशी कामगिरी केलेली नाही.