
ICC T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. भारताला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. मात्र, दोन पराभवानंतर भारताने आता विजयाचं खातं उघडलं आहे. 2007 च्या विश्वविजेत्याने भारतीय संघाने बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव करून ICC T20 विश्वचषक-2021 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली आहे. भारताच्या रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीने विजयाचा पाया रचला. रोहितने 74 तर राहुलने 69 धावा केल्या. दोघांनी जबरदस्त भागीदारी करुन 2007 मध्ये बनवलेला मोठा विक्रम मोडला.

प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. मेन्स T20 विश्वचषकात भारताची ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. करीम जनातने रोहितला बाद करून ही भागीदारी तोडली.

याआधी मेन्स T20 विश्वचषकात भारतासाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या नावावर होता. या दोघांनी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 136 धावांची भागीदारी केली होती.

यानंतर रोहितने कर्णधार विराट कोहलीसोबत टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी केली होती. या दोन्ही फलंदाजांनी 2014 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध 106 धावा केल्या होत्या. टीम इंडिया या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, पण जिंकू शकली नाही.

कोहली आणि रोहितने 2014 मध्येच बांगलादेशविरुद्ध आणखी एक शतकी भागीदारी केली होती. त्या सामन्यात दोघांनी 100 धावा जोडल्या होत्या.