
विराट कोहलीच्या फलंदाजीत अजून हव्या तशा धावा येत नाहीत. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी चिंतेत आहेत. पण क्षेत्ररक्षण करताना त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात हा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. विराट कोहलीने या सामन्यात एक झेल घेताच हा विक्रम नोंदवला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात भारताने पाकिस्तानला 241 धावांवर रोखलं. यावेळी विराट कोहलीने दोन झेल पकडले. पहिला झेल घेताच विराट कोहलीच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

विराट कोहलीने कुलदीप यादव टाकत असलेल्या 47 व्या षटकात नसीम शाहचा उत्तम झेल पकडला. यासह विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणारा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला आहे.

विराट कोहलीने 299 व्या सामन्यात 157 झेल पकडला आणि मोहम्मद अझहरूद्दीनचा रेकॉर्ड मोडला. अझहरूद्दीने 2000 साली म्हणजेच आजपासून 25 वर्षांपूर्वी झेलचा विक्रम नावावर केला होता. त्याने 156 झेल पकडले होते. 25 वर्षानंतर हा विक्रम विराट कोहलीने मोडला.

वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आता तिसऱ्या स्थानावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्याने 218 झेल पकडले आहेत. तर रिकी पॉन्टिंगच्या नावावर 160 झेल आहेत.