
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे पार पडला. हा सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. तसेच एक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. टीम इंडियाने मायदेशात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे.

मायदेशात विजयाची मालिका कायम ठेवलेल्या टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे. तसेच मायदेशात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीत दुसरं स्थान गाठलं आहे.

भारताने 2013 पासून आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. इंग्लंड आणि भारत यांच्यातील ही 17 वी कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पाचवा सामना होण्यापूर्वीच भारताने 3-1 ने सीरिज जिंकली.

मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे आहे. 1993 पासून 2008 पर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. एकूण 28 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे भारताला हा विक्रम मोडण्यासाठी मायदेशात होणाऱ्या आणखी 11 कसोटी मालिका जिंकाव्या लागतील.

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने त्यांच्या त्यांच्या मायदेशात 16 मालिकेत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजने 1974 ते 1994 च्या दरम्यान ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 1982 ते 1994 च्या कालावधीत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती.

या आधी भारताने 1987 ते 1999 या कालावधीत सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004 ते 2012 या कालावधीतही 14 मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे भारताला भारतात पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही.