
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. या सामन्यावरही भारताची मजबूत पकड दिसत आहे. तसं पाहिलं तर भारताने 2012 पासून इंग्लंडला विजयाची चव चाखू दिली नाही. 2012 साली दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.

2017 साली तीन सामन्यांची टी20 मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1 असा धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 7 विकेट राखून पराभूत केलं होतं. पण त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. दुसरा सामना 5 धावांनी, तर तिसरा सामना हा 75 धावांनी जिंकला.

2018 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. पहिला सामना भारताने 8 विकेटने जिंकला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आणि 5 विकेट राखून जिंकला. तिसरा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला.

2021 साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. पहिला सामना इंग्लंडने, दुसरा सामना भारताने, तिसरा सामना इंग्लंडने, चौथा आणि पाचवा सामना भारताने जिंकला.

2022 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला. (सर्व फोटो- बीसीसीआय)