IPL 2023 | आयपीएल तोंडावर असताना टीमला धक्का, फ्रँचायजी नव्या कॅप्टनच्या शोधात
आयपीएलच्या 16 व्या मोसमाला अवघे काही दिवस राहिलेत. त्याआधी सर्व सघांनी सरावाला सुरुवात केली. मात्र कॅप्टनला दुखापत झाल्याने या टीमचं टेन्शन वाढलंय.

श्रेयस अय्यर याच्या दुखापतीने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. सोबतच कोलकाता नाईट रायडर्ससाठीही डोकेदुखी वाढली आहे. अहमदाबाद कसोटीदरम्यान श्रेयस अय्यरला पाठीला दुखापत झाली. यानंतर तो कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी उतरू शकला नाही. दुखापतीमुळे श्रेयस ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर पडला. आता अय्यरला आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या टप्प्याला मुकावं लागू शकतं.

टीआयओनुसार, श्रेयस अय्यर आयपीएलच्या पहिल्या टप्प्प्यात खेळू शकणार नाही. अय्यर सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच त्याला बंगळुरूला पाठवण्यात आले.

श्रेयस अहमदाबाद कसोटीत 2 दिवस फिल्डिंग करत होता. यानंतर त्याच्या पाठीच्या खालच्या भागात सूज आली. कर्णधार रोहित शर्मा यानेही अय्यरची दुखापत गंभीर असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे अय्यरचं इतक्यात कमबॅक होणं अवघड समजलं जातंय.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरची कॅप्टन्सी कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. श्रेयस व्यतिरिक्त आंद्रे रसेल, शाकिब अल हसन आणि नितीश राणा हे 3 प्लेअर कॅप्टन्सीसाठी प्रबळ दावेदार आहेत.

श्रेयस दुखापतीतून सावरला नाही, तर केकेआर फ्रँचायजीला नवा कर्णधार शोधावा लागेल. अय्यरने गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाची सूत्र हाती घेतली होती.