
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची स्थिती नाजूक आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असताना या स्पर्धेच्या मध्यात एमएस धोनी पुन्हा संघाचे नेतृत्व करेल याची कोणीही कल्पनाही केली नसेल. पण आता ते घडले आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई संघाचा कर्णधार झाला आहे. धोनीने आयपीएलमध्ये कधीही न घडलेल्या घडामोडीचा साक्षीदार झाला आहे. धोनी आयपीएलच्या इतिहासात कर्णधारपद भूषवणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू झाला आहे.

आयपीएलच्या इतिहासात संघाचे नेतृत्व करणारा एमएस धोनी हा पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. ज्या खेळाडूंनी पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे किंवा पाच वर्षांपासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्लेइंग इलेव्हनचा भाग नाहीत. त्यांना अनकॅप्ड खेळाडू मानले जाते.

टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 500 सामने खेळणारा धोनी ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. जुलै 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. अशा स्थितीत सीएसकेने त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात कायम ठेवले.

धोनीला आयपीएलमधील सर्वात वयस्कर कर्णधार होण्याचा मान देखील मिळाला आहे. धोनीचे वय सध्या 43 वर्षे आणि 278 दिवस आहे. त्याने स्वतःचा जुना विक्रम मोडला आहे. यापूर्वी 2023 च्या आयपीएल फायनलमध्ये जेव्हा त्याने संघाचे नेतृत्व केले तेव्हा त्याचे वय 41 वर्षे आणि 325 दिवस होते.