
वूमन्स प्रीमिअर लीग 2023 मधील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तसेच दिल्लीची कॅप्टन्सी मेग लॅनिंग करणार आहे.

उभयसंघांनी या मोसमात 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. मात्र दिल्लीने नेट रनरेटच्या आधारावर अव्वल स्थान पटकावलं. साखळी फेरीत दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामन्यात बाजी मारली.

या मोसमात मेग हीने सर्वाधिक 310 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिच्याकडे ऑरेन्ज कॅप आहे. तिने या दरम्यान 2 अर्धशतकं ठोकली आहेत. तर मुंबईकडून नॅट सव्हिअर ब्रँट हीने सर्वाधिक 272 धावा केल्या आहेत.

दिल्लीकडून सर्वाधिक 10 विकेट्स या शिखा पांडे हीने घेतल्या आहेत. तर मुंबईकडून साईका इशाक हीने 15 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यामुळे आता अंतिम सामन्यात कोण बाजी मारत चॅम्पियन ठरणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.