
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठीची लढत रंगतदार वळणावर आली आहे. वेस्ट इंडिजने अमेरिकेला पराभूत करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अमेरिकेने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 129 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने हे आव्हान 10.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं.

शाई होपने या सामन्यात आक्रमक खेळी केली. त्याने 39 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 12 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 27 धावांची खेळी केली.

निकोलस पूरनने आपल्या नाबाद 27 धावांच्या खेळीत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तीन षटकार मारत निकोलस पूरनने ख्रिस गेलला मागे टाकले आहे. पूरनने आतापर्यंत खेळलेल्या 6 डावात 17 षटकार मारले आहेत.

टी20 वर्ल्डकपच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत निकोलस पूरन आघाडीवर पोहोचला आहे. निकोलस पूरनने 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 17 षटकार मारले आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत निकोलस पूरनचे 17 षटकार झाले आहेत. ख्रिस गेलने 2012 वर्ल्डकप स्पर्धेत 16 षटकार, मार्लन सॅम्युअल्सने 2012 टी20 वर्ल्डकपमध्ये 15 षटकार, शेन वॉटसनने 2012 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 15 षटकार मारले आहेत.