
पाकिस्तानी संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून पाकिस्तानने मालिका 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना औपचारिक असणार आहे.

पाकिस्तानने दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवताच एका विक्रमाची नोंद केली आहे. दक्षिण अफ्रिकेत सर्वाधिक द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा आशियातील पहिला देश बनण्याचा विक्रम केला आहे.

पाकिस्तानने 11 वर्षांपूर्वी 2013 मध्ये पहिल्या द्विपक्षीय वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. त्यानंतर 2021 मध्ये दुसऱ्यांदा वनडे मालिका जिंकली. आता 2024 मध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकात 329 धावा केल्या. बाबर आझमने 73 धावा, मोहम्मद रिझवानने 80 धावा, तर कामरान गुलामने 196 च्या स्ट्राईक रेटने 63 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा डाव 43.1 षटकात 248 धावांवर आटोपला.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत दोन वनडे मालिका जिंकल्या आहेत. भारताने 2017 आणि 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली होती.