
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. तीन षटकार ठोकताच रोहित शर्मा एक नंबर फलंदाज होणार आहे. रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून 231 षटकार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इयोन मॉर्गनच्या नावावर कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकारांची नोंद आहे. आतापर्यंत त्याने 233 षटकार मारले आहेत. आता 3 षटकार मारताच त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद होणार आहे.

रोहित शर्माने 123 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात त्याने कसोटीत 21, वनडेत 105 आणि टी20 क्रिकेटमध्ये 105 षटकार मारले आहेत.

रोहित शर्माने 2007 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याने 262 वनडे सामने खेळला आहे. यात त्याने 10709 धावा केल्या आहेत. यात 31 शतकांचा समावेश आहे.