
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं सुवर्ण पदक हुकलं त्यामुळे क्रीडाप्रेमींना वाईट वाटलं होतं. पण कांस्य पदक जिंकून भारतीय संघाने हॉकीचा श्वास सुरु असल्याचं दाखवून दिलं होतं. भारतीय संघाने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं आहे. आता भारतीय संघ पुढील महिन्यात पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

आशिया हॉकी स्पर्धा चीनमध्ये होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 8 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 17 सप्टेंबरला सांगता होईल. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, चीन, जापान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे देश सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 8 सप्टेंबरला सुरु होणार असली तरी हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

चीनमधील हुलुनब्युअर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिला सामना 8 सप्टेंबर रोजी दक्षिण कोरिया आणि जापान यांच्यात होणार आहे. याच दिवशी भारतीय हॉकी संघ चीनशी भिडणार आहे. भारताचा सामना 9 सप्टेंबरला जापान, 11 सप्टेंबरला मलेशिया, 12 सप्टेंबरला दक्षिण कोरिया आणि 14 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे.

साखळी फेरीत सर्व संघ एकमेकांसमोर येतील. साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल 4 संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील. या चार संघांपैकी विजयी दोन संघ अंतिम फेरी गाठतील आणि जेतेपदासाठी लढाई करतील.

मागच्या पर्वात भारताने आशिया कप स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे यंदा जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या सहा संघांपैकी भारतच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. त्यामुळे यंदाही भारताचं पारडं जड आहे. त्यामुळे भारत चॅम्पियन होण्याची शक्यता आहे.

आशिया कप स्पर्धेत भारत आतापर्यंत चारवेळा चॅम्पियन ठरला असून आता पॅरिस ऑलिम्पिकनंतर पुढील स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याची प्रतीक्षा करावी लागेल.