
अंडर 19 वर्ल्ड कप सारख्या टुर्नामेंटमधून भविष्यातील स्टार खेळाडू समजतात. त्यांना एक ओळख मिळते. आता पहिल्यांदाच महिला क्रिकेटर्ससाठी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा होतेय. दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा सुरु झालीय. भारताला पहिल्याच सामन्यात 18 वर्षीय बॅट्समनच्या रुपात भविष्यातील स्टार खेळाडू दिसली आहे.

शनिवारी 14 जानेवारी टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कपमधील पहिला सामना झाला. भारताने ही मॅच 7 विकेटने जिंकली. यात 18 वर्षाच्या श्वेता सहरावतने टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

डावाची सुरुवात करताना श्वेताने 57 चेंडूत 92 धावा फटकावल्या. तिने टीमला विजय मिळवून दिला. ती आपल्या शतकापासून चुकली. कारण तो पर्यंत टीम इंडियाने विजयी लक्ष्य गाठलं होतं.

भारतीय टीमची उपकर्णधार असलेल्या श्वेताच्या इनिंगच वैशिष्टय म्हणजे तिने चौकारांचा पाऊस पाडला. दिल्लीहून येणाऱ्या या आक्रमक ओपनरने एकूण 20 चौकार ठोकले. तिने 92 पैकी 80 धावा चौकारांमधून वसूल केल्या.

श्वेताच नाही, टीम इंडियाची कॅप्टन शेफाली वर्माने सुद्धा धावा कुटल्या. शेफालीने एका ओव्हरमध्ये 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा फटकावल्या. तिने 16 चेंडूत 45 धावा फटकावून टीम इंडियाला वेगवान सुरुवात दिली.