
अमेरिकेने वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. टीम इंडियाचा 40 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला आहे. अमेरिकेने हा विक्रम आयसीसी विश्वचषक लीग 2 स्पर्धेत केला आहे.

अल एमीरेट्स स्टेडियमवर मैदानावर अमेरिका आणि ओमान संघ आमनेसामने आले होते. ओमानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 35.3 षटकात 122 धावा केल्या.

अमेरिकेने 122 धावांचं सोपं आव्हान देऊनही ओमनला महाग पडलं. ओमान 25.3 षटकात फक्त 65 धावा करून सर्वबाद झाला. हा सामना अमेरिकेने 57 धावांच्या फरकाने जिंकला. यावेळी नोस्टुशने 7.3 षटकात 11 धावा देत 5 गडी बाद केले.

अमेरिकेने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावा करूनही विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. 1985 मध्ये टीम इंडियाने अगदी कमी फरकाने विजय मिळवला होता.

1985 मध्ये झालेल्या रोथमन फोर-नेशन्स कप स्पर्धेतील एका सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 125 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ 87 धावा करू शकला. हा सामना टीम इंडियाने 38 धावांनी जिंकला.

वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावा काढल्यानंतर 50 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणारा जगातील एकमेव संघ असल्याचा विक्रमही अमेरिकेने केला.