
चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पणात भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड पहिल्या स्थानावर आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करताना 52 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर वरुण चक्रवर्ती म्हणाला, 'सर्वप्रथम मला सुरुवातीला चिंता वाटली. मी भारतासाठी एकदिवसीय स्वरूपात जास्त सामने खेळलेले नाहीत पण जसजसा खेळ पुढे चालू राहिला तसतसे मला बरे वाटले. विराट, रोहित, श्रेयस आणि हार्दिक माझ्याशी बोलत होते आणि त्यामुळे मदत झाली.'

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतासाठी दुसरी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा मान वरुण चक्रवर्तीला मिळाला. या यादीत रवींद्र जडेजा पहिल्या स्थानावर आहे. रवींद्र जडेजाने 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीत वेस्ट इंडिज विरुद्ध 36 धावा देत पाच गडी बाद केले होते.

वरुण चक्रवर्तीने गेल्या महिन्यातच इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध आपल्या एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने त्याला संघात संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने एक विकेट घेतली होती. पण या सामन्यात संधी मिळताच आपलं कौशल्य दाखवलं. 2 सामन्यांमध्ये 16 च्या सरासरीने आणि 4.80 च्या इकॉनॉमीने 6 विकेट्स घेतल्या आहेत.

वरुण चक्रवर्ती दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 5 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.त्याने स्टुअर्ट बिन्नीला मागे टाकले आहे. 2014 मध्ये मिरपूर येथे बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6/4 बळी घेतले होते.