
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा ऑलआऊट करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता.

वडोदऱ्याच्या कोटाम्बी मैदानात आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगला. आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 19.3 षटकात सर्व गडी गमवून 141 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला ऑलआऊट करताच आरसीबीच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

आरसीबीच्या आधी हा विक्रम मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्या नावावर होता. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या 20 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला तीन वेळा ऑलआऊट केलं आहे. तर यूपी वॉरियर्सने 18 सामन्यात तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांना मागे टाकले आहे. आरसीबीने 20 सामन्यात 4 वेळा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

दुसरीकडे, आरसीबीने 20 सामन्यापैकी 10 सामन्यात विजय मिळवला असून यशस्वी संघांच्या यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर विजयी मालिका सुरू ठेवली तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (13 विजय) यांना मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचू शकेल.