
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिटमध्ये आग लागल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब घडली आहे.मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं.

शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय.

लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं. दरम्यान, 10 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे.

आता भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील 10 बाळांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.