
११ एप्रिलच्या रात्री येडशीकडील कंपनीच्या गेटमधून पट्टेदार वाघ कंपनीत आल्याचे एका कामगाराला दिसला. वाघ कंपनीच्या आवारात आल्याची माहिती आरसीसीपीएल एमपी बिर्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुकुटबन येथील वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी एन साळुंखे यांना दिली.

साळुंके आपले संपूर्ण कर्मचारी वर्ग घेऊन कंपनीत दाखल झाले. वाघ कुठून व कसा आला याबाबत माहिती घेऊन शोध सुरू केला. हा वाघ शिकारीसाठी जंगली प्राण्यांच्या मागे आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला.

पट्टेदार वाघ हा रात्री जंगलात न जाता कंपनीच्या हद्दीत असलेल्या झाडाझुडपात दडून बसून आहे. या वाघाला कंपनीतील काही लोकांनी तसेच गावातील लोकांनी सुद्धा पाहिले आहे. पट्टेदार वाघाने सिमेंट कंपनीमध्येच मुक्काम केल्याने कंपनीतील अधिकारी व कर्मचारी कामगार प्रचंड दहशतीत कामावर जात आहे.

पट्टेदार वाघ कामगारांना दोन ते तीन वेळा दिसला. ११ एप्रिलनंतर पुन्हा १६ एप्रिल रोजी गावकऱ्यांना तो झुडपात दिसला. वाघाने गेल्या पाच दिवसापासून सिमेंट कंपनीच्या आवारात आपले राहण्याचे स्थान बनवले असल्यामुळे गावकऱ्यांमध्येही भीती आहे.

वाघाने कंपनीतील कोणत्याही कामगार किंवा ग्रामस्थावर हल्ला केला नाही. तसेच गावातील कोणत्याही प्राण्यावर हल्ला केला नाही. वाघाने पुन्हा जंगलात जावे, यासाठी येडशीकडील गेट खुला केल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली आहे.

पांढरकवडा उपविभागात सध्या 24 पट्टेदार वाघ आहे. त्यापैकी 4 पट्टेदार वाघ झरी तालुक्यात आल्याची माहिती आहे. सिमेंट कंपनीत आलेला वाघ नेमका कुठून आला, त्याचाही शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहे.