काश्मीरला जाण्याची गरज नाही, महाराष्ट्रातच आहे ढगांच्या कुशीत वसलेलं सुंदर हिल स्टेशन; तलाव, धबधबे अन् निसर्गरम्य दऱ्यांचा अनुभव

Travel: सुट्टीत नेहमीच्या पर्यटनस्थळांपेक्षा काहीतरी वेगळं अनुभवायचं असेल तर याठिकाणाला नक्की भेट द्या. ढगांच्या कुशीत वसलेलं हे सुंदर हिल स्टेशन आहे.

| Updated on: Nov 20, 2026 | 11:13 AM
1 / 10
महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. मात्र, गर्दीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस शांतपणे घालवायचे असतील, तर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे सुंदर हिल स्टेशन हिरव्यागार डोंगरांनी, खोल दऱ्यांनी, सुंदर तलावांनी आणि धबधब्यांनी नटलेलं आहे.

महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. मात्र, गर्दीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस शांतपणे घालवायचे असतील, तर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे सुंदर हिल स्टेशन हिरव्यागार डोंगरांनी, खोल दऱ्यांनी, सुंदर तलावांनी आणि धबधब्यांनी नटलेलं आहे.

2 / 10

थंडगार हवा, धुक्याने व्यापलेले डोंगर आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे तोरणमाळला महाराष्ट्रातील एक लपलेलं पर्यटनस्थळ मानलं जातं. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी खास आहे. तोरणमाळ हे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं छोटंसं हिल स्टेशन आहे. इथलं निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करतं.

3 / 10

विशेष म्हणजे तोरणमाळ हे नाव परिसरात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या 'तोरणा' वृक्षावरून पडलं आहे. स्थानिक आदिवासी समुदाय या वृक्षाला आणि तोरणा देवीला विशेष धार्मिक महत्त्व देतात. त्यामुळे या ठिकाणाला निसर्गासोबत सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाही लाभला आहे.

4 / 10

तोरणमाळमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे यशवंत तलाव. हा नैसर्गिक तलाव हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला आहे. तलावाच्या शांत पाण्यात डोंगरांचं प्रतिबिंब पाहण्याचा अनुभव खास असतो. इथं बोटिंग, तलावाच्या काठावर फेरफटका आणि फोटोग्राफीचा आनंद घेता येतो. पक्षीनिरीक्षणासाठीही हा परिसर उत्तम आहे.

5 / 10

खोल दरी, उंच कडे आणि आजूबाजूचा निसर्ग यामुळे सीताखाई हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे. या ठिकाणाचा संबंध रामायणातील सीतेशी जोडला जातो. इथल्या नैसर्गिक खडकांची रचना आणि दरीचं विहंगम दृश्य पाहण्यासारखं आहे. पावसाळ्यात धुक्याने व्यापलेला परिसर एखाद्या सुंदर चित्रासारखा दिसतो.

6 / 10

सातपुडा पर्वतरांगांचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी खडकी पॉइंटला भेट देता येईल. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी इथलं निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसतं. पावसाळ्यात परिसरातील हंगामी धबधब्यांचं सौंदर्यही अनुभवता येतं.

7 / 10

कमळतलाव हे नावाप्रमाणेच कमळांच्या फुलांनी सजणारा हा तलाव निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी आकर्षण आहे. शांत पाणी, हिरवळ आणि फुलांनी नटलेला परिसर मनाला प्रसन्न करतो.

8 / 10

तोरणमाळला धार्मिक महत्त्वही आहे. इथल्या गोरखनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या काळात मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतूनही भाविक इथं दर्शनासाठी येतात. याशिवाय मच्छिंद्रनाथ गुहा हेही धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं ठिकाण आहे.

9 / 10

तोरणमाळला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा उत्तम काळ मानला जातो. पावसाळ्यानंतरचा हिरवागार परिसर आणि हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना विशेष आकर्षित करतं. मुंबईपासून तोरणमाळ साधारण 500 ते 520 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकपासून हे अंतर सुमारे 295 किलोमीटर आहे. रेल्वेने जायचं असल्यास नंदुरबार हे जवळचं प्रमुख रेल्वे स्टेशन असून तेथून सुमारे 84 किलोमीटरचा रस्त्याने प्रवास करावा लागतो. शहादा इथून तोरणमाळ साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे.

10 / 10

तोरणमाळमध्ये निवासाच्या सुविधा तुलनेने मर्यादित असल्याने प्रवासापूर्वी राहण्याची व्यवस्था करून ठेवणं फायद्याचं ठरतं. तसंच स्थानिक वाहतुकीचं नियोजनही आधी करावं. त्यामुळे यंदाच्या सुट्टीत नेहमीच्या पर्यटनस्थळांपेक्षा काहीतरी वेगळं अनुभवायचं असेल, तर सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या सुंदर तोरणमाळला नक्की भेट द्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us