
रेल्वेने प्रवास करणं हे काही वेळा खूप जिकीरीचं असतं, काही प्रवास सोपे, छोटे पण काही प्रवासासाठी तर 15-20 तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. दरवेळेस ऑनसलाइन व्यवहार करणं शक्य नसतं, आणि काढलेले पैसे संपल्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो.

पण आता प्रवासादरम्यान पैशांची चिंता करण्याची गरजच नाही, कारण आता धावत्या ट्रेनमध्येही प्रवाशांना एटीएमची सुविधा मिळणार आहे. प्रवाशांची पैसे काढण्याची गरज लक्षात घेऊन रेल्वेने आता ट्रेनमध्येच एटीएमची सोय सुरू केली आहे

मुंबई ते मनमाडदरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सुरू असतानाही प्रवाशांना पैसे काढता येणार आहेत.

रेल्वेतच प्रवाशांना एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा बँकेने उपलब्ध केली असून एका बोगीच्या रिकाम्या स्पेस मध्ये हे एटीएम उभारण्यात आले असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करुन एक खास कोच तयार करण्यात आला आहे. त्यातच हे एटीएम बसवण्यात आले असून हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. एटीएम सेवा असलेली ही ट्रेन नुकतीच मुंबईत आली.

पंचवटी एक्स्प्रेसच्या एसी चेअर कारमध्ये हे एटीएम बसवण्यात आले आहे. कोचमधील पूर्वी न वापरलेल्या जागेत हे एटीएम बसवले असल्याने सीट्सची व्यवस्था किंवा इतर सुविधांवर परिणाम होणार नाही.

चालत्या ट्रेनमध्ये एटीएमचे काम योग्य रितीने व्हावं यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रने हे एटीएम मशीन पुरवले असून ते मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला एक शटर देखील लावण्यात आलं आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासात ज्यांना पैशांची गरज असेल ते लोक एटीएममधून सहज पैसे काढू शकतात.