
उल्हासनगर शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच आता उल्हासनगरमधील गणेश नगर भागात मुसळधार पावसामुळे नाल्यावरील एक पूल कोसळला आहे.

रविवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, एका तरुणीचा थोडक्यात जीव वाचला आहे.

या घटनेमुळे ५०० हून अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

हा पूल जुना आणि जीर्ण अवस्थेत होता. त्याची दुरावस्था झाली होती.

या पुलाची डागडुजी करावी, यासाठी स्थानिकांनी अनेकदा आंदोलनं केले होते. तसेच नवा पूल बांधण्याची मागणी केली होती.

मात्र उल्हासनगर महापालिका प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

काही नागरिकांनी पूल कोसळलेल्या ठिकाणी बसून प्रतीकात्मक रडण्याचे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. तसेच तात्काळ नवा पूल बांधून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे.