
ग्लोबल टेंशन आणि टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची बैठक होणार आहे. जगाच लक्ष या बैठकीकडे लागलं आहे. कारण आजची बैठक यशस्वी ठरली, तर भारताला टॅरिफमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. युक्रेनसोबत युद्ध रोखण्यासाठी रशियाशी डील होऊ शकते, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. असं झाल्यास त्यात भारताचा फायदा आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी अलास्कामध्ये पुतिन यांना भेटणार आहेत. तात्काळ युद्धविराम होईल की नाही हे सांगता येत नाही, असं अमेरिकी राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. रशिया-युक्रेनमध्ये शांती करार घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत.

फॉक्स न्यूज रेडियोच्या “द ब्रायन किल्मेडे शो” मध्ये दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, हा करार मी करीन, असा मला विश्वास आहे. पुतिन सुद्धा म्हणाले की, अमेरिका युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची बैठक भारतासाठी महत्त्वाची आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची अपेक्षा आणि पुतिन यांनी दिलेले संकेत यावरुन डील होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा फायदा भारताला मिळेल. एकदिवसापूर्वीच अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट इशारा दिला की, राष्ट्रपती ट्रम्प आणि पुतिन यांच्यात अलास्का येथे होणारी बैठक यशस्वी ठरली नाही, तर यूएस भारतावर सेकेंडरी टॅरिफ लावू शकतो. टॅरिफ 50 टक्क्यापेक्षा जास्त वाढवेल.

अमेरिकेने भारताच्या सामानावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. यात 25 टक्के टॅरिफ 7 ऑगस्टपासून लागू झालाय. उर्वरित 25 टक्के टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदीसाठी भारतावर सेकेंडरी टॅरिफ लावण्यात आले आहेत.