
घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. अनेकजण वास्तूशास्त्राला केवळ घराच्या दिशा किंवा खोल्यांच्या रचनेपुरते मर्यादित मानतात.

मात्र, दैनंदिन सवयी आणि वास्तू नियमांचे पालन केल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदते. तुम्ही राहत असलेल्या घरात विशेषतः स्वयंपाकघराबाबत काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेकांना रात्री जेवण झाल्यावर भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवण्याची सवय असते. काही जण ती सकाळी घासतात. विशेषतः हिवाळ्यात थंड पाण्यामुळे किंवा कधी कधी कंटाळा आल्याने काहीजण असं करतात. मात्र काहींना ही सवय सर्रास असते. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात रिकामी आणि उष्टी भांडी जमा होणे अत्यंत अशुभ मानले जाते.

शास्त्रांनुसार, ज्या घरात रात्री उष्टी भांडी ठेवली जातात, तिथे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी कोपतात. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासू शकते आणि आर्थिक प्रगती खुंटते.

घाणेरड्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा थेट परिणाम घरातील सदस्यांच्या मानसिक शांतीवर होतो. ज्या घरामध्ये स्वयंपाकघर अस्वच्छ असते, तिथे विनाकारण भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण होते.

यामुळे झोपण्यापूर्वी केवळ भांडीच नाही, तर ओटा आणि स्वयंपाकघराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. तसेच जर काही कारणास्तव भांडी घासणे शक्य नसेल, तर ती किमान पाण्याने स्वच्छ धुवून (विसळून) ठेवावीत, जेणेकरून त्यात अन्नाचे अंश राहणार नाहीत. यामुळे स्वच्छ स्वयंपाकघर हे घरामध्ये सकारात्मकता आणि आरोग्य मिळते.