
वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे जे मानवी जीवनासाठी खूप महत्वाचे मानले जाते. आपण झोपेतून जागे झाल्यानंतरच्या पहिल्या नजरेला खूप महत्त्व असतं. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की सकाळी उठल्यावर आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्याचा मनावर, उर्जेवर आणि दैनंदिन क्रियाकलापांवर परिणाम होतो. तसेच आपल्या विचारांवरही त्याचा प्रभा पडतो, असं म्हणतात.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही गोष्टी लगेच पाहणे हे अशुभ मानले जाते. वास्तु शास्त्रात ज्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे, त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.

सावली : सकाळी अंथरुणातून उठताच कधीही तुमच्या सावलीकडे पाहू नका. उठताच सावलीकडे पाहणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात असं म्हटल आहे की सावली पाहणे ही दिवसाची चांगली सुरुवात नाही. यामुळे जीवनात नकारात्मक ऊर्जा वाढते.

तुटलेला आरसा : सकाळी उठून तयार होत असताना आणि बाहेर पडताना तुटलेला आरसा पाहणे टाळावे. असे करणे अशुभ मानले जाते आणि तुमची कामं खराब होऊ शकतात.

रात्रीची खरकटी भांडी : वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर लगेच स्वयंपाकघरातील खरकटी, न धुतलेली भांडी पाहणे शुभ नाही. त्यामुळे उठल्यानंतर लगेच स्वयंपाकघरातील खरकटी भांडी पाहू नये. असे केल्याने घरात दुःख आणि दारिद्र्य येते.

बंद घड्याळ : वास्तुमध्ये घड्याळे देखील खूप महत्त्वाची मानली जातात. घरात बंद असलेले घड्याळ ठेवणे किंवा ते पाहणे शुभ नाही असे म्हटले जाते. यामागील कारण म्हणजे राहूचा संबंध इलेक्ट्रॉनिक गोष्टींशी आहे, म्हणून बंद पडलेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घरातून काढून टाकाव्यात. म्हणून, सकाळी उठल्यानंतर चुकूनही बंद घड्याळाकडे पाहू नये. असे केल्याने जीवनात मोठ्या समस्या निर्माण होतील.

तुटलेल्या मूर्ती : सकाळी उठल्यावर देव-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती पाहणे किंवा त्यांना स्पर्श करणे देखील टाळावे. तुटलेल्या मूर्ती घरातील नकारात्मक ऊर्जा वाढवतात. तुटलेल्या मूर्ती पवित्र नदीत विसर्जित कराव्यात. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)