
इराणमधील वाढता तणाव आणि समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. यामुळे जगभरात तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सध्या आपण दररोज LPG, CNG किंवा PNG यांसारखे शब्द सातत्याने ऐकत आहोत. पण या सर्वांचे गुणधर्म आणि उपयोग वेगवेगळे आहेत. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम पदार्थांपासून मिळणाऱ्या या इंधनांमधील तांत्रिक फरक समजून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.

LPG या शब्दाचा फुलफॉर्म Liquefied Petroleum Gas असा होता. LPG हा प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या वायूंचे मिश्रण आहे. हा वायू खनिज तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून (Refinery) मिळतो.

उच्च दाबाखाली या वायूचे रूपांतर द्रवात करून तो सिलेंडरमध्ये भरला जातो. हा वायू हवेपेक्षा जड असतो, त्यामुळे गळती झाल्यास तो जमिनीलगत साचून राहतो. याचा मुख्य वापर घरगुती स्वयंपाकासाठी केला जातो.

Compressed Natural Gas असा CNG फुल फॉर्म असून याचा अर्थ म्हणजे दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू. यामध्ये मुख्यत्वे मिथेन असतो. हा वायू पर्यावरणासाठी अतिशय पूरक मानला जातो.

कारण पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत यातून कमी प्रदूषण होते. हा हवेपेक्षा हलका असल्याने गळती झाल्यास लगेच हवेत विरघळतो. याचा सर्वाधिक वापर रिक्षा, कार आणि बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीत इंधन म्हणून होतो.

PNG चा फुल फॉर्म Piped Natural Gas असा होतो. PNG हा देखील नैसर्गिक वायूच आहे, जो पाईपलाईनद्वारे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. जेव्हा नैसर्गिक वायू घरांमध्ये किंवा उद्योगांमध्ये पाईपद्वारे पुरवला जातो, तेव्हा त्याला 'पाईप्ड नॅचरल गॅस' म्हणतात.

यासाठी ग्राहकांना सिलेंडरची गरज भासत नाही. हा वायू अत्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर मानला जातो. कारण तो सतत उपलब्ध असतो आणि साठवणुकीचा धोका नसतो.

LNG म्हणजे Liquefied Natural Gas. जेव्हा नैसर्गिक वायूला उणे 160 डिग्री अंश सेल्सिअस तापमानापर्यंत अतिशय थंड केले जाते, तेव्हा त्याचे रूपांतर एलएनजी म्हणजेच द्रवरूप नैसर्गिक वायूत होते.

वायूचे आकारमान कमी करून त्याची लांब अंतरावर वाहतूक करणे सोपे व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. मोठ्या जहाजांमधून किंवा टँकर्समधून या वायूची आयात-निर्यात केली जाते. जिथे पाईपलाईन पोहोचू शकत नाही, तिथे हा गॅस वापरला जातो.