
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने लग्नाच्या 11 वर्षांनंतर पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला आहे. परस्पर संमतीने विभक्त होत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. ईशा आणि भरत हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं कुठे बिनसलं, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जातोय, की दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा आणि भरत यांच्यात दुरावा निर्माण झाला. ईशाने स्वत:च्या तिच्या पुस्तकात याचा उल्लेख केला होता. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ईशाने भरतला कानाखाली मारल्याचा किस्साही प्रकाशझोतात आला आहे.

ईशा देओल 13 वर्षांची होती, तेव्हापासून भरत तिच्यावर प्रेम करायचा. हे दोघं शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात. दोघांची शाळा वेगवेगळी असल्याने फार कमी वेळा त्यांची एकमेकांशी भेट व्हायची. एकदा शाळेतल्या स्पर्धेदरम्यान भरतने अचानक ईशाचा हात धरला होता.

यावरून रागावलेल्या ईशाने थेट त्याच्या कानाखालीच वाजवली होती. या घटनेच्या बऱ्याच कालावधीनंतर हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली. कानाखाली मारल्याच्या घटनेनंतर जवळपास 10 वर्षे दोघं एकमेकांच्या संपर्कात नव्हते.

दहा वर्षांनंतर जेव्हा ईशा आणि भरत एकमेकांसमोर आले, तेव्हा भरतने तिला प्रपोज केलं. "मी आता तुझा हात पकडू शकतो का", असा प्रश्न त्याने विचारताच ईशाने होकार दिला. तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करू लागले होते.