
अंडी ताजी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजमधील त्यांची जागा अत्यंत महत्त्वाची असते. अनेक घरांमध्ये फ्रीजच्या दरवाजाला अंडी ठेवण्यासाठी खास एग ट्रे दिलेला असतो, त्यामुळे आपण नैसर्गिकरित्या अंडी तिथेच ठेवतो.

मात्र, तज्ज्ञांच्या मते ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. अंडी दीर्घकाळ सुरक्षित आणि ताजी ठेवण्यासाठी दरवाजा ही जागा योग्य नसून, आरोग्याच्या दृष्टीने आपण आपली ही सवय बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अंडी नक्की कुठे आणि कशी साठवावीत, याबद्दलचे शास्त्रोक्त नियम जाणून घेणे गरजेचे आहे.

फ्रीजचा दरवाजा आपण वारंवार उघडतो आणि बंद करतो. यामुळे तिथल्या तापमानात सतत चढ-उतार होत असतात. अंड्यांच्या गुणवत्तेसाठी स्थिर तापमान अत्यंत आवश्यक असते.

दरवाजा उघडल्यामुळे अंडी बाहेरील गरम हवेच्या संपर्कात येतात, ज्यामुळे ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यांच्यातील पोषकतत्त्वे कमी होतात. अंडी नेहमी फ्रीजच्या सर्वात आतील भागात किंवा मधल्या कप्प्यात ठेवावीत.

आतल्या भागात तापमान सर्वात जास्त स्थिर असते. अंडी शक्यतो ज्या पुठ्ठ्याच्या डब्यात (Carton) येतात, त्यातच ठेवावीत. यामुळे त्यांना फ्रीजमधील इतर पदार्थांचा वास लागत नाही.

अंडी ठेवताना त्यांचा टोकदार भाग खाली आणि रुंद भाग वर ठेवावा. यामुळे अंड्यातील एअर सेल स्थिर राहते. यामुळे अंडं जास्त काळ ताजं राहतं. अंडी फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी कधीही धुवू नयेत. अंड्यांच्या कवचावर एक नैसर्गिक संरक्षक थर असतो. जो धुण्यामुळे निघून जातो आणि बॅक्टेरिया आत शिरण्याचा धोका वाढतो.