
बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाण हा कायमच चर्चेत राहिला आहे. टिकटॉकवरील रिल्सने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर सूरज हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये दिसला. अतिशय साध्या भोळ्या स्वभावाचा, गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आणि बिग बॉसचा विजेता ठरला. आता सूरजने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पण त्याच्या या प्रवासात अनेक जवळचे लोक सहभागी झाले नसल्याचे म्हटले जात आहे.

काल, 29 नोव्हेंबर रोजी सूरज चव्हाणने मोठ्या थाटामाटात पुण्याजवळील सासवडमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. त्याने चुलत मामाची मुलगी संजना गोफणेशी अरेंज मॅरेज केले. त्याच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यामधील सूरजच्या लग्नाची पत्रिका ही विशेष चर्चेचा विषय ठरली होती. यामध्ये लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची यादी पाहून सर्वजण आतुर होते. पण आता सूरजच्या लग्नाला कोणीही आले नसल्याचे दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात असल्यापासून अंकिता वालावलकर ही सूरजला भाऊ मानत होती. अंकिता सतत सूरजच्या संपर्कात देखील असते. तिने सूरज आणि संजनाचे केळवण देखील केले होते. तसेच लग्नाच्या खरेदीसाठी ती सूरजसोबत दिसत होती. पण आता सूरजच्या लग्नाला मात्र ती गैरहजर असल्याचे दिसत आहे.

सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकरने हजेरी लावली. 'बिग बॉस मराठी' सिझन पाचच्या दरम्यान जान्हवी सूरजला म्हणाली होती की,"तुला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी हजर असेन." त्याप्रमाणे लाडक्या भावाच्या लग्नात करवली म्हणून मिरवायला जान्हवी नटूनथटून हजर होती.

‘बिग बॉस’च्या मंचावर सूरज आणि होस्ट रितेश देशमुख यांच्यात खास नाते निर्माण झाले होते. विजेता झाल्यानंतर सूरजची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून रितेशने स्वतः पुढाकार घेऊन त्याला मदत केली होती. तसंच सूरजचा पहिला चित्रपट ‘झापुक झुपूक’चा ट्रेलरही रितेशच्या हस्ते लॉन्च करण्यात आला होता. मात्र, लग्नपत्रिकेत नाव असूनही रितेश या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाहीत. सध्या ते आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

सूरजने स्वतः जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांना लग्नाचं खास निमंत्रण दिलं होतं. पत्रिकेतही ‘अजित दादा’ यांचं नाव छापले होते. विशेष म्हणजे, लग्नानंतर सूरज ज्या नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे, ते घरही अजित पवारांनी बांधून दिलं आहे. तरीही दादांचा बीड दौरा असल्याने ते या लग्नाला येऊ शकले नाहीत.

सूरजचा ‘झापुक-झुपूक’ चित्रपट दिग्दर्शित करणारे केदार शिंदे यांचंही सूरजसोबत खास नातं आहे. मात्र, तेही आपल्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. आता केदार शिंदे लग्नानंतर सूरजला भेटण्यासाठी जाणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.