
आपण अनेकदा पाहिलं असेल की कोणतीही पूजा-विधी करताना किंवा शुभ कार्याला बाहेर जाताना कपाळावर टिळा लावला जातो. कपाळावर टीळा लावण्यासाठी चंदन, केशर आणि कुंकू वापरले जाते. पण बहुतांश वेळा टिळा लावताना सर्वात जास्त कुंकू वापरले जाते.

एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर टिळा लावल्यानंतर त्यावर तांदळाचे काही दाणे लावले जातात. काही ठिकाणी पूजा झाल्यावर, तसेच इतर काही शुभप्रसंगी डोक्यावर किंवा आजूबाजूला तांदूळ टाकले जातात.

मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की कपाळावर टिळा लावल्यानंतर त्यावर तांदूळ का लावले जातात? यामागचं नेमकं काय दडलंय, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कुंकवाचा टिळा लावल्यानंतर त्यावर तांदूळ लावणे हा जरी श्रद्धेचा विषय असला, तरी यामागे काही धार्मिक कारणे आहेत.

अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. तांदूळ हे सर्वात शुद्ध अन्न मानले जाते. त्यामुळे लहान पूजा असो किंवा मोठा विधी, तांदळाला विशेष महत्त्व असते. देवाला अर्पण केलेल्या नैवेद्यामध्येही तांदळाचा वापर केला जातो.

तांदळाला अक्षत असेही म्हणतात, ज्याचा अर्थ कधीही नष्ट न होणारे. त्यामुळे कोणत्याही कामाच्या यशासाठी आणि ते काम चिरंतन टिकून राहावे यासाठी तांदळाचा वापर केला जातो. त्यामुळे टिळा लावल्यानंतर त्यावर तांदूळ लावले जातात.

हिंदू धर्मात तांदूळ हा समृद्धी आणि धनाचा प्रतीक मानला जातो. त्याचा वापर केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, अशी लोकांची श्रद्धा आहे. यामागे काही वैज्ञानिक कारणंही दडलेली आहेत.

कपाळावर टिळा लावल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तांदळाचे दाणे या उर्जेला अधिक बळ देतात. अनेकांच्या मते तांदूळ हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. जेव्हा ते डोक्यावर किंवा आजूबाजूला टाकले जातात, तेव्हा नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता पसरते. त्यामुळेच टिळा लावल्यावर त्यावर तांदळाचे दाणे लावले जातात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)