
ऑफिसला जाण्याची घाई असो किंवा पावसाळ्यात अडकलेली वाहतूक, ओला-उबरसारख्या कॅबचे भाडे अचानक वाढलेले दिसते. अनेकदा १५० रुपये असणारे भाडे गर्दीच्या वेळी थेट ४०० ते ५०० रुपयांपर्यंत जाते.

कॅबचे दर वाढणं याला तांत्रिक भाषेत 'सर्ज प्राइसिंग' (Surge Pricing) किंवा 'डायनॅमिक प्राइसिंग' असे म्हणतात. पण अचानक ही दरवाढ का होते? त्याचे नेमके कारण काय? याची माहिती आता समोर आली आहे.

जेव्हा एखाद्या भागात प्रवाशांची संख्या अचानक वाढते आणि त्या तुलनेत गाड्या कमी असतात, तेव्हा सॉफ्टवेअर आपोआप भाडे वाढवते. यामुळे ज्यांना खरोखर तातडीने प्रवास करायचा आहे, तेच ग्राहक कॅब बुक करतात. तसेच, जास्त पैसे मिळत असल्यामुळे लांब असलेले ड्रायव्हर्सही त्या गर्दीच्या भागात येण्यास तयार होतात.

कॅब कंपन्यांचे सॉफ्टवेअर रिअल-टाइममध्ये काम करते. यात केवळ प्रवाशांची संख्याच नाही, तर ट्रॅफिकची स्थिती आणि हवामान यांचाही विचार केला जातो. जर एखाद्या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असेल, तर ड्रायव्हरचा वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी 'सर्र्ज' लावला जातो.

कमी भाड्यात तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणे ड्रायव्हर्सना परवडत नाही. अशा वेळी भाडे वाढल्यास ड्रायव्हर्स जास्तीत जास्त राईड्स स्वीकारतात. या वाढीव पैशांचा काही हिस्सा ड्रायव्हर्सना इन्सेंटिव्ह म्हणून दिला जातो, जेणेकरून त्यांच्या कामांनाही प्रोत्साहन मिळते.

पाऊस पडल्यावर किंवा लोकल-बस उशिराने धावत असल्यास अचानक कॅबची मागणी वाढते. अशा वेळी उपलब्ध गाड्यांचे योग्य वाटप करण्यासाठी सिस्टीम भाडे वाढवते. त्यामुळे ज्या लोकांना खरंच गरज आहे, असेच लोक कॅब बुक करतात.