
प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या सिमकार्डमुळे जग अगदी जवळ आले आहे. आपण कधीही कुठेही बसून एकमेकांना फोन लावू शकतो.

पण तुम्हीही अनेकदा पाहिले असेल की सिम कार्ड च्या एका बाजूचा कोपरा हा कापलेला असतो? यामागे नक्की कारण काय? याचा विचार तुम्ही कधी केलात का?

सिम कार्डच्या या खास डिझाईनमागे मोबाईल फोन हे मुख्य कारण होते. बाजारात आलेल्या सुरुवातीच्या मोबाईल फोनमधून सिम कार्ड काढणं शक्य नव्हतं.

पूर्वी तुम्ही दररोज सिम बदलू शकत नव्हता, कारण तसे मोबाईल फोनच उपलब्ध नव्हते. म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीचा फोन घेतला तर तुम्हाला त्याच कंपनीचं सिम वापरावं लागत होतं.

पण जसा काळ बदलला, तशी नवनवीन टेक्नोलॉजी भारतात आली. या फोनमध्ये सिम कार्ड बाहेर काढता येत होतं. नवीन सिम लावता येत होतं. पण तेव्हा सिमचा कोपरा कापलेला नसायचा.

मोबाईल फोनमध्ये सिम काढण्याची आणि लावण्याची पद्धत नवीन असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी येत होत्या. अनेक लोक त्यांच्या मोबाईल फोनमध्ये सिम व्यवस्थित लावू शकत नव्हते.

पुढे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. यानंतर टेलिकॉम कंपन्यांनी सिमच्या डिझाईनमध्ये बदल करण्याचा विचार केला. जेणेकरून लोकांना सिम लावताना कोणतीही अडचण येऊ नये.

विशेष म्हणजे सिम कार्डची सरळ बाजू कोणती आणि उलट बाजू कोणती हे समजत नव्हते. त्यामुळेही सिमच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी सिमचा एक कोपरा कापून टाकला. तसेच मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी हे सिम लावलं जातं, त्या जागेवरही त्याच आकारचा तसाच ठेवावा असे मोबाईल कंपन्यांना सांगण्यात आले.

यामुळे लोकांची अडचण दूर झाली. ते सहजपणे त्यांच्या फोनमध्ये सिम कार्ड टाकू लागले. त्यामुळे सिम कार्ड हे एका बाजूने कापलेले असते.