
योगा केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे. निरोगी शरीरासाठी अनेक योगासने केली जातात. योगा करताना योगा मॅटचा वापर करणे एक सामान्य बाब आहे. पण योगा नेहमी योगा मॅटवरुच का केला जातो, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. पण यामागे काही वैज्ञानिक आणि पारंपरिक कारणे आहेत. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही योगा करत असाल किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल, तर योगा मॅटचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. पूर्वी लोक योगासाठी गवत, चटई किंवा रबर चटईचा वापर करायचे, पण आता बहुतांश लोक योगा मॅटचा वापर करतात.

संतुलन आणि पकड: योगा करताना शरीराचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे असते. विशेषतः उभे राहून एखादे आसन करत असताना संतुलन साधावे लागते. ही आसनं करत असताना घसरण्याचा धोका असतो. योगा मॅटचा पृष्ठभाग नॉन-स्लिपरी असल्याने तुम्ही घसरत नाही. तसेच तुम्हाला यामुळे योग्य पोझिशनमध्ये उभं राहण्यास मदत मिळते.

सांध्यांना आधार आणि आराम: योगामध्ये अनेक आसने गुडघे, कोपर यांसारख्या सांध्यांवर दबाव आणतात. योगा मॅट या सांध्यांसाठी गादीसारखे काम करते. यामुळे दबाव कमी होतो. तसेच आधारही मिळतो. यामुळे योगा करताना वेदना किंवा दुखापत होण्याची शक्यता कमी असते.

स्वच्छता: थेट जमिनीवर योगा केल्यास धूळ, बॅक्टेरिया आणि ऍलर्जी निर्माण करणारे कण शरीराच्या संपर्कात येऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी किंवा बागेत योगा करत असाल तर ही समस्या प्रकर्षणाने तुम्हाला जाणवू शकते. अशावेळी योगा मॅटवर योगा केल्याने तुम्हाला स्वच्छ वातावरणात योगा करता येतो.

आरामदायक अनुभव: काही योगासनांमध्ये गुडघे, कोपर आणि पायांवर जास्त ताण येतो. ज्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते. योगा मॅटमुळे तुम्हाला आरामात योगा करता येतो. ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ योगाचा आनंद घेता येतो.

मॅटशिवाय योगा शक्य आहे का? जर तुमच्याकडे योगा मॅट नसेल, तर तुम्ही पारंपरिक पद्धतीनुसार गवत किंवा सुती चटईचा वापर करू शकता. मात्र, मॅटशिवाय योगा करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हे करताना तुम्हाला कोणतीही दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे, योगा करताना योगा मॅटचा वापर करणे सोयीचेच नाही, तर ते तुमच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी देखील महत्त्वाचे आहे.