आता वयाच्या 25 व्या वर्षी मधुमेहाचा धोका, तरुणांनी काय काळजी घ्यावी?
आता वयाच्या 25 व्या वर्षी मधुमेहाचा धोका संभावतो. मधुमेहाचा धोका टाळायचा असेल, तर त्याची काळजी आधीच घेतली पाहिजे. यासाठी तरुणांनी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या.

मधूमेहाचा धोका थेट चाळिशीनंतर उद्भवत नाही. तर त्याची सुरुवात 25 ते 35 वयात होते. तुमचा चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे चाळीशीच्या आतच जीवनशैली सुधारणे गरजेचे असते.
अनेकांच्या आहारात भात, मैदा, ब्रेड सारखे पदार्थ सहज दिसून येतात. तुम्हाला मधूमेहाचा धोका टाळायचा असेल, तर आजपासूनच ब्राऊन राइसचा आहारात समावेश करण्यास विसरू नका. तसेच तुम्ही आहारात दाळ, पनीर, दही, अंडी सारख्या पदार्थांचाही समावेश करू शकता. हिरव्या पालेभाज्या, पेरू, पपई सारखे फळ देखील खाऊ शकता.
तुमच्या अर्ध्या ताटात सॅलड आणि भाजी हवी. त्यानंतर उरलेल्या भागात भाकरी आणि भाताचा समावेश करावा. जेवताना सावकाश जेवण करावे. जेवण करताना टीव्ही पाहणे किंवा मोबाईल फोनचा वापर करणे टाळावे.
जेवताना आधी सॅलड, हिरव्या भाज्या, दाळ, पनीरसारख्या प्रथिनयुक्त पदार्थ खा. त्यानंतर भात किंवा भाकरी खा. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. फळांचा रस पिण्याऐवजी फळ खाणे फायदेशीर ठरेल.
नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीच्या जेवणाच्या वेळा पाळा. रात्री झोपण्याच्या दोन-तीन तासाआधी जेवण करावे. जेवण केल्यानंतर 10 मिनिटे चालावे. (डिस्क्लेमर: तुम्ही कोणताही उपचार, उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)