
युट्यूबर अरमान मलिक अत्यंत आलिशान आयुष्य जगतो. दोन लग्नांमुळे तो अनेकदा चर्चेत येतो. आपल्या दोन्ही पत्नी आणि मुलांसोबत तो एकत्र राहतो. युट्यूबद्वारे अरमान किती कमाई करतो, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहित असेल की युट्यूबर बनण्याआधी तो मिस्त्रीचं काम करत होता.

युट्यूबच्या माध्यमातून अरमानने अवघ्या अडीत वर्षांच्या कालावधीत तगडी कमाई केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला होता. या मुलाखतीत अरमानने सांगितलं की तो आठवी पास आहे.

युट्यूबर म्हणून नाव कमावण्याआधी अरमानने अनेक छोटी-मोठी कामं केली आहेत. याच मुलाखतीत अरमानने त्याची एकूण संपत्ती किती आहे, याविषयी सांगितलं. तो म्हणाला, "आजच्या घडीला माझी संपत्ती 100 ते 200 कोटींच्या घरात असेल."

याशिवाय अरमानकडे 10 फ्लॅट्स आहेत. अरमान त्याच्या दोन पत्नी आणि चार मुलांसोबत राहतो. दहा पैकी चार फ्लॅट त्याचे कुटुंबीय वापरतात. तर इतर फ्लॅट्स त्याने युट्यूबच्या टीमला काम करण्यासाठी दिले आहेत. त्याच्याकडे स्टुडिओ, म्युझिक स्टुडिओ, 6 एडिटर, 2 ड्राइव्हर, 4 पीएसयू आणि 9 मोलकरीणी आहेत.

अरमानने सांगितलं की कोरोना काळात त्याच्याकडे काहीच नव्हतं. टिकटॉकच्या माध्यमातून तो दर महिन्याला अडीच लाख रुपये कमवत होता. त्यानंतर त्याने युट्यूबच्या माध्यमातून कमाई केली. अवघ्या अडीच वर्षात त्याने ही एवढी संपत्ती कमावली आहे.