‘लाज वाटते, आमच्यातील लोकांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं!’ आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात

| Updated on: Feb 24, 2022 | 2:24 PM

उत्तर प्रदेशात 400 जागांपैकी 51 जागांवर शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना राज्याबाहेर ताकद आजमावून पहात आहे.

लाज वाटते, आमच्यातील लोकांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं! आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Follow us on

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली. उत्तर प्रदेशातील (UP Elections) जनता विद्यमान सरकारच्या नेतृत्वावर समाधानी नसून येथे केवळ दंगे आणि द्वेषाची भाषा पसरवली जात आहे. त्यामुळे या राज्यात परिवर्तनाची लाट येणे आवश्यक असून शिवसेनेचे उमेदवार हेच परिवर्तनाचं प्रतीक आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. या भाषणात बोलताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना सत्तेत असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तेव्हा या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं, आमच्यातीलच काही लोकांनी शेतकऱ्यांना असं म्हटल्याबद्दल आम्हाला अजूनही खंत वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचीही हीच स्थिती झाली असून आता यात बदल आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं.

‘आमची चूक झाली, शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणालो’

उत्तर प्रदेशातील सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं होतं. शेतकरी बंधू-भगिनी मुंबईकडे येऊ लागले. एक विशाल मोर्चा येऊ लागला. तेव्हाच्या सरकारमध्ये शिवसेनादेखील होती. त्यावेळी आमच्याकडून खूप चुका झाल्या. पण आता आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना काय काय म्हणलं गेलं. त्यांचा झेंडा लाल होता. त्यांचं रक्त लाल होतं. त्यांना माओवादी, नक्षलवादी, दहशतवादी म्हटलं गेलं. पण ते शेतकरी होते, आपल्या हक्कांसाठी लढत होते. त्याच गोष्टी इथे घडल्या. लखीमपूरची घटना कुणी विसरलंय का? या गोष्टींमुळे खूप जखमा झाल्या आहेत, हीच स्थिती बदलण्याची गरज आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं.

‘भाषप फक्त दंगे, द्वेषाची भाषा करतं’

उत्तर प्रदेशातील सध्याचं सरकार केवळ लोकांना घाबरवण्याचं काम करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, ‘ परिवर्तनाचे वारे येथेही वाहत आहे. उत्तर प्रदेशातही परिवर्तन होणार आहे. जे स्वप्न दाखवले, ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे परिवर्तन झाले पाहिजे. आम्हालाही महाराष्ट्रात वाटलं होतं. उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमतानं भाजप सरकार बनलं. आता खरंच विकासाची गंगा वाहणार, असं वाटलं होतं. पण जी आश्वासनं दिली होती. आशा, स्वप्न दाखवली, त्यांचे केवळ जुमलेच बनले. इथे फक्त दंगे आणि द्वेषाच्या गोष्टी झाल्या. अजूनही उत्तर प्रदेशातील पाच वर्ष आणि देशातील भाजपचे सात वर्ष.. भाजप फक्त लोकांना घाबरवत आहे. हा धोक्यात आहे, तो धोक्यात आहे… पण कुणीही धोक्यात नाही. ही श्रीरामांची भूमी आहे. आपला देश आहे.

उत्तर प्रदेशात शिवसेनेचे 51 उमेदवार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा शिवसेनेनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर विस्ताराचा अजेंडा अधिक प्रभावीपणे राबवला जात आहे. गोव्यात शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. तर उत्तर प्रदेशात 400 जागांपैकी 51 जागांवर शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना राज्याबाहेर ताकद आजमावून पहात आहे.

इतर बातम्या-

नवाब मलिकांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला, ईडीचे अधिकारी चौकशी करण्याची शक्यता

आईने बापाचा खून केला, पाच मुलं पोरकी, पोलिसातलं ‘मातृत्व’ जागं झालं, पाचही लेकरं दत्तक