‘कर्जमाफीच्या पैशाचं काय करता? साखरपुडे, लग्न…’ कर्जमाफीबद्दल विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्याला सुनावलं!

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याला सुनावलं आहे. या शेतकऱ्याने कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला होता.

कर्जमाफीच्या पैशाचं काय करता? साखरपुडे, लग्न... कर्जमाफीबद्दल विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्याला सुनावलं!
manikrao kokate
| Updated on: Apr 04, 2025 | 9:43 PM

Manikrao Kokate : कर्जमाफीबाबत विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याला सुनावलं आहे. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, असं कोकाटे यांनी म्हटलंय. तसंच कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले आहेत. माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी ते नाशिकमध्ये गेले होते.

शेतकऱ्याने विचारला प्रश्न

माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्याने माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलं. ‘अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ असं शेतकरी कोकाटे यांना उद्देशून म्हणाला.

त्या पैशांचं तुम्ही काय करता?

शेतकऱ्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, “जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही. समोर मीडिया उभी आहे. त्यामुळे मीडियासमोर मी जास्त बोलत नाही. पण मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा

तसेच आता सरकार तुम्हाला (शेतकऱ्यांना) शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं.

अजित पवार काय म्हणाले होते?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफी हा माझा विषय नाही. याबात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतली, असं त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तर याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसून शेतकऱ्यांनी कर्ज भरावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं.