“शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, सरकारमध्ये आहात सूचना काय देता, अंमलबजावणी करा”

| Updated on: Nov 02, 2019 | 6:14 PM

महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेवरुन रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बेसुमार हाल होत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, सरकारमध्ये आहात सूचना काय देता, अंमलबजावणी करा
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेवरुन रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बेसुमार हाल होत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना फडणवीस सरकार 10 हजार कोटींची मदत देत आहे. ही अगदी तुटपुंजी मदत आहे, असं मत अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “राज्यभरात अवकाळी पावसाने नुकसान केलं आहे. त्यामुळे ही मदत कशालाही पुरणार नाही. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. ते सरकारमध्ये आहेत सूचना काय देत आहेत. त्यांनी थेट अंमलबजावणी करावी. नवीन सरकार येऊपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे. असं बोलून त्यांनी कातडी बचाव भूमिका घेऊ नये.”

जनतेचा कौल भाजप-शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशीही मागणी अजित पवारांनी केली. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आपआपल्या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करत असल्याचीही माहिती दिली. ते म्हणाले, “शरद पवार यांनी नाशिकमधील अनेक तालुक्यांचा दौरा केला आहे. आमचे इतर नेतेही आपआपल्या भागातील दौरा करत आहेत.”

“आत्तापर्यंत अनेकदा शेतीचं नुकसान पाहिलं, मात्र इतकं कधीच झालेलं नाही”

अजित पवार यांनी यावेळी अवकाळी पावसाने झालेलं संपूर्ण राज्यभरातील नुकसान प्रचंड असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मी सातव्यांदा आमदार झालो. आत्तापर्यंत अनेकदा शेतीचं नुकसान पाहिलं. मात्र, यावेळी जितकं नुकसान झालं, तितकं कधीच झालं नव्हतं. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. जनावारांना चाराही राहिला नाही. एकही असं पीक नाही ज्याचं या अवकाळी पावसाने नुकसान झालं नाही. रोगराई पसरत आहे. याची जाण आत्ताच्या राज्यकर्त्यांना नाही. ती त्यांना असायला हवी. आत्तापर्यंत तात्पुरती स्थिती समोर आली असून अजून मोठं नुकसान समोर येणं बाकी आहे.”