Ajit Pawar : राजकीय हेतूने कारवाई करणं आपली परंपरा नाही, अजित पवारांनी भाजपला सुनावलं

| Updated on: Jul 31, 2022 | 12:34 PM

Ajit Pawar : अजित पवारांनी राज्याची तिजोरी खाली केली असा आरोप शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला उत्तर द्यायचं नाही. कोरोनाचं संकट असताना आरोग्याच्या बाबतीत निधीची कमतरता पडू दिली नाही.

Ajit Pawar : राजकीय हेतूने कारवाई करणं आपली परंपरा नाही, अजित पवारांनी भाजपला सुनावलं
राजकीय हेतूने कारवाई करणं आपली परंपरा नाही, अजित पवारांनी भाजपला सुनावलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड: कोणी दोषी असेल मग तो कोणीही असो, कोणत्याही गटाचा, पक्षाचा, जातीधर्माचा असेल त्याने जर संविधानाचा, कायद्याचा भंग केला असेल, काही चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग तो कोणीही असो. पण राजकीय हेतूने कारवाई करू नये. राजकीय हेतूने कारवाई करणं ही आपल्या देशाची, राज्याची परंपरा नाही. उद्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे निदान स्वातंत्र्याच्या महोत्सव साजरा करत असताना तरी चुकीचं काही करू नये. त्यात शंकाकुशंका घेण्याची प्रश्न निर्माण होऊ नये, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी भाजपला(bjp) सुनावलं. अजित पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते बीडमध्ये (beed) होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. तसेच आपल्या कार्यकाळात तिजोरी खाली झाल्याचा शिंदे गटाच्या आमदारांचा आरोप निखालस खोटा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वेगवेगळ्या संस्थांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. आपली बाजू मांडावी लागते. राऊतांवर ईडीने कारवाई केली. माझं या संदर्भात संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले नाही. खरोखरच कुणी दोषी असेल तर तो कुणीही व्यक्ती असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे. पण जर राजकीय हेतूने कारवाई होत असेल तर तर तशी आपली परंपरा नाही, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्यांच्या वक्तव्यावर बोलायचं नाही

अजित पवारांनी राज्याची तिजोरी खाली केली असा आरोप शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला उत्तर द्यायचं नाही. कोरोनाचं संकट असताना आरोग्याच्या बाबतीत निधीची कमतरता पडू दिली नाही. कोण कोणत्या चष्म्यातून पाहतो त्यावर बोलणं योग्य नाही. अशा लोकांना मी उत्तर देणार नाही, असंही ते म्हणाले.

राऊतांच्या घरी ईडीची रेड

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरावर आज ईडीने छापे मारले. सकाळी 7 वाजल्यापासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ती अजूनही सुरू आहे. यावेळी ईडीने राऊतांच्या वकिलांनाही बोलावून घेतलं आहे. तब्बल पाच तासापासून ही चौकशी सुरू असल्याने राऊत यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. राऊत यांच्या भांडूपच नाही तर दादर येथील घरावरही ईडीने छापे मारले आहेत. हा फ्लॅट ईडीने आधीच सील केला होता. तिथेही ईडीने छाननी सुरू केल्याने राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.