
सोमवारी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि लाखो बॉलिवूड चाहते शोक व्यक्त करत आहेत. सामान्यांपासून ते सेलिब्रेटी अन् राजकीय मंडळींपर्यंत सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं आहे. धर्मेंद्र यांच्या आठवणीत सगेळचजण शोक व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांना अजूनही हे सत्य पचवणे कठीण जात आहे की आज धर्मेंद्र नाहीयेत. यावरून धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबावर काय परिस्थिती ओढावली असेल याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. त्यात आज हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जाण्यानंतर पहिल्यांदाच पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही आठवणी शेअर करत भावूक झालेल्या त्या दिसल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार हेमा मालिनी यांच्या भेटीला
या दुःखद बातमीनंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेमा मालिनी यांची मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. अजित पवार हे देखील अभिनेते धर्मेंद्र यांचे चाहते होते. फक्त चाहतेच नाही तर चांगले मित्रही होते. अजित पवार यांनी हेमा मालिनी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. मंगळवारी दुपारी अजित पवार हेमा मालिनी यांच्या घरी गेले होते.
धर्मेंद्र यांचे चित्रपटातील योगदान, त्यांची लोकप्रियता अशा अनेक आठवणींना उजाळा
त्यांनी बराच वेळ हेमा यांच्याशी गप्पा मारल्या, धर्मेंद्र यांचे चित्रपटातील योगदान, त्यांची लोकप्रियता आणि त्यांनी मागे सोडलेल्या प्रचंड आठवणींबद्दल चर्चा केली. या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. दरम्यान ही भेट मुद्दामच माध्यमांपर्यंत पोहोचू दिली नाही कारण हा धर्मेंद्र यांचं जाणं हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे त्यामुळे ही एक मित्रतापूर्ण तसेच कौटुंबिक अशी सांत्वनपर भेट होती.
अजित पवार यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल काय म्हटले?
सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव हेही अजित पवार यांच्यासह बैठकीत उपस्थित होते. तिघेही काही वेळ एकत्र बसले आणि धर्मेंद्र यांना प्रत्येक पिढीने आवडणारा कलाकार आणि प्रचंड यशानंतरही, जमिनीवर टिकून राहिलेला माणूस म्हणून आठवले. उपस्थित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी हेमा यांच्याशी चर्चा करताना म्हटले, “धर्मेंद्र यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील “सुवर्ण युगाचा” अंत झाला”. त्यांनीही धर्मेंद्र यांच्यासारखा माणूसकीला जपणारा व्यक्ती गेल्याची खंत व्यक्त केली. कारण धर्मेंद्र यांनी केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर लोकांच्या हृदयातही एक विशेष स्थान निर्माण केले होते. अजित पवार यांच्यासोबतच्या या भेटीतून हे सिद्ध झाले की धर्मेंद्र हे केवळ एक सुपरस्टार नव्हते तर साधेपणा जपणारा एक चांगला माणूस आणि मित्र होते.