
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषदेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. अनगर नगरपरिषदेत 17 पैकी 17 जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या. आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विजयाच्या जल्लोषात राजन पाटील यांचे सुपूत्र बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर बाळराजे राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेतलं. जाहीर दिलगिरी व्यक्त केली.
आता बाळराजे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेल्या चॅलेंजनंतर उमेश पाटील आक्रमक झाले आहेत. “पाटलाला माफी नाही. आमच्याकडे चुकीला माफी नाही. अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार” असं उमेश पाटील म्हणाले. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. “बाळराजे पाटलाने मोहोळच्या पंडित देशमुख यांची हत्या केली. त्यातून तो निर्दोष मुक्त झाला असला तरी हायकोर्टात यावर याचिका आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षाही भयंकर आणि निर्घृण हत्या पंडित देशमुख यांची झाली होती. हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल आहे. मात्र 20 वर्षात ही केस बोर्डात आहे. हायकोर्टातील मोठ्या अधिकाऱ्याला हाताशी धरून ही केस बोर्डावर येऊ दिली नाही” असा दावा उमेश पाटील यांनी केला.
कारण गटार म्हटलं की त्यांना राग येतो
“पालकमंत्री गोरे हे चांगले नेते आहेत. ते सोलापूर जिल्ह्यासाठी वेळ देत आहेत. मात्र भाजपाला लक्षात आले आहे की, मोहोळमध्ये फुलायचं असेल, तर डबक्याची गरज आहे. डबक्याची म्हणतोय कारण गटार म्हटलं की त्यांना राग येतो. म्हणून त्यांनी राजन पाटील या डबल्याला पक्षात घेतलय. मात्र पवार कुटुंबाने यांच्यावर एवढे वर्षे उपकार केले. त्यानंतर 15 दिवसापूर्वी पक्ष बदलल्यावर ते अजितदादांबाबत अशी भाषा वापरत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री यांच्याबद्दल बोलायला मागे पडणार नाहीत” असं उमेश पाटील म्हणाले.