अजित पवारांनी व्हीप बजावूदे, आमदारकी गेली तरी शरद पवारांसोबत : अनिल पाटील

| Updated on: Nov 25, 2019 | 12:27 PM

राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचाच आदेश पाळणार, मग आमदारकी गेली काय आणि राहिली काय, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल पाटील यांनी दिली

अजित पवारांनी व्हीप बजावूदे, आमदारकी गेली तरी शरद पवारांसोबत : अनिल पाटील
Follow us on

मुंबई : कोणीही व्हीप बजावला तरीही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांचाच आदेश पाळणार, मग आमदारकी गेली काय आणि राहिली काय, अशी प्रतिक्रिया अमळनेरचे आमदार अनिल पाटील (Anil Patil on Ajit Pawar) यांनी हरियाणाहून परतल्यानंतर दिली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर पाटील काही काळ संपर्काबाहेर होते.

‘याला बंडखोरी कशी म्हणायची? राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने, जे राष्ट्रवादीच्या विधीमंडळाचे गटनेते आहेत, त्यांनी (अजित पवार) आम्हाला सात वाजता बोलावलं. काय कारण असेल, हे विचारण्याचा काही संबंधच नाही. पक्षाची बैठक असेल, असं आम्हाला वाटलं. त्यानंतर राजभवनाकडे नेण्यात आलं. याच्यात बंडखोरी कशी म्हणता येईल?’ असा सवाल अनिल पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’ शी बोलताना केला.

‘पवार साहेब म्हणजे अजित दादा आणि अजित दादा म्हणजे पवार साहेब, अशी आमची धारणा आहे. पवार साहेबांना विचारल्याशिवाय राष्ट्रवादीतील कुठल्या नेत्यावर आम्ही भरोसा ठेवायचा? सर्वेसर्वा शरद पवारांनंतर जर महाराष्ट्रात कोणी निर्णय घेत असतील, तर ते म्हणजे अजित दादा. त्यांनी सांगितल्यानंतर, त्यांची जी भूमिका असेल, ती शरद पवारांची भूमिका. अजितदादांचा निरोप आल्यानंतर तो पक्षाचा आदेश आहे, हेच आम्ही गृहित धरलं.’ असंही अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर आम्हाला भाजप नेते दिसले, त्यावेळी याचा उलगडा झाला. सोबत असलेल्या आमदारांशी चर्चा करताना राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन करतंय, असं लक्षात आलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जर तो निर्णय घेतला असेल, तर तो अंतिम मानून आपण मान्य करायचा, असं ठरलं. त्यानंतर अजित पवारांनी आमच्याशी चर्चा केली, असंही अनिल पाटील यांनी सांगितलं.

कोणाला दिल्लीतून, कोणाला हरियाणातून, राष्ट्रवादीने आमदारांना ‘असं’ परत आणलं!

‘सगळे आमदार लवकरात लवकर इथे पोहचतील. शरद पवार साहेबही येतील, असं अजित पवारांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला तिथून दिल्लीला रवाना करण्यात आलं. दुसऱ्या विमानाने बाकीचे आमदार येतील, असं आम्हाला सांगितलं गेलं. जेव्हा आम्ही बातम्या पाहिल्या, तेव्हा काहीतरी चुकतंय असं लक्षात आलं. मग आम्ही शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. पक्ष जो निर्णय घेईल, त्यांच्याशी आम्ही सहमत असू, अशी हमी आम्ही दिली.’ असं अनिल पाटील म्हणाले.

कोणीही व्हीप बजावला, तरी माझ्यासह सर्व आमदारांनी ठरवलं आहे, की अंतिम निर्णय शरद पवार साहेबांचा असेल. मग आमदारकी गेली काय आणि राहिली काय, आम्हाला त्याचं सोयरसुतक नसेल, असं अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं.

अनिल पाटील यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना फेसबुकवरुन व्यक्त केल्या होत्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील आणि दौलत दरोडा यांना काल रात्री विमानाने मुंबईला आणलं. ते दोघं हरियाणातील गुरुग्राममध्ये असलेल्या एका हॉटेलात वास्तव्याला होते. तर आमदार नितीन पवारही काल मुंबईत दाखल झाले. आमदार नरहरी झिरवळ दिल्लीत एका सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती आहे. सर्व आमदारांना मुंबईतील ‘द हयात’ हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले असून सध्या आपल्यासोबत 53 आमदार आहेत. अण्णा बनसोड पुण्यात असल्यामुळे त्यांची सही झालेली नाही, तर धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क झालेला आहे, पण ते आमच्यासोबत आहेत. आता अजित पवार वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

Anil Patil on Ajit Pawar