
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला धमकावल्याचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली. अनिक्षाला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ही कोठडी सुनावली. अमृता फडणवीस यांना १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, असा आरोप आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा पोलिसांनी केला. कट रचण्याच्या आरोपासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील गुन्हाही दाखल करण्यात आला. मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली.
त्यानुसार, अनिक्षा आणि अमृता यांची भेट नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती. वडील पोलिसांना सट्टेबाजांबाबत माहिती देतात. त्यातून पैसे कमावू शकतो, असं अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटलं. त्यावर बोलताना अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील अनिल जयसिंघानी यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केलेत.
फरार बुकी अनिल जयसिंघानी यांनी टीव्ही ९ मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिच्या अटकेनंतर अनिल जयसिंघानी यांनी खुलासा केला. आमच्यावर अन्याय झालाय. मी काही बोलल्यास मुलीला कोठडीत त्रास होईल, असं अनिल जयसिंघानी यांनी म्हटलं आहे. माझ्या मुलीवर केलेली केस पूर्णपणे बोगस असल्याचं अनिल जयसिंघानी याने म्हटलं आहे. अनिल जयसिंघानी यांच्याशी टीव्ही ९ चे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी फोनवरून संवाद साधला.
जयसिंघानी म्हणाले, माझ्या मुलीवर बोगस केस करण्यात आली. मी काहीही स्टेटमेंट दिली तर माझ्या मुलीला कोठडीत त्रास होईल. पोलीस कोठडीच्या बाहेर येऊ द्या. दूध का, दूध पाणी का पाणी होईल. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल. माझी प्रकृती बरी नाही. संध्याकाळी फोन करा. माझं वयही झालं आहे. मी पेपर पाठवेन. आमच्यासोबत अन्याय होतोय. हे सर्व भगवान पाहत आहे, असंही अनिल जयसिंघानी यांनी म्हंटलं.
अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो भाजपनं ट्वीट केला. त्यावर सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं. त्यावेळी एकनाथ शिंदे हे उल्हासनगरचे जिल्हाप्रमुख होते. अनिल जयसिंघानी हे उल्हासनगरमध्ये राहतात. जिल्हाप्रमुकांच्या परवानगीशिवाय उद्धव ठाकरे यांना त्यावेळी मातोश्रीवर फेटण्याची परवानगी नव्हती, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर त्यावेळी भेट घालून दिल्याचा आरोप केलाय.