‘आप’च्या कार्यालयात केजरीवाल कुटुंबाचं दुहेरी सेलिब्रेशन

दिल्लीतील 'आम आदमी पक्षा'च्या कार्यालयातच सुनिता केजरीवाल यांचा बर्थडे आणि पक्षाच्या विजयाचं दुहेरी सेलिब्रेशन करण्यात आलं.

आपच्या कार्यालयात केजरीवाल कुटुंबाचं दुहेरी सेलिब्रेशन
| Updated on: Feb 11, 2020 | 3:44 PM

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्नीला अनोखं बर्थडे गिफ्ट (Kejriwal Family Double Celebration) दिलं आहे. दिल्लीच्या मिसेस मुख्यमंत्री अर्थात सुनिता केजरीवाल यांच्या वाढदिवशीच दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नवी दिल्ली मतदारसंघातून पुन्हा विजयी होत केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक केली आहे.

दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या कार्यालयातच सुनिता केजरीवाल यांचा बर्थडे आणि पक्षाच्या विजयाचं दुहेरी सेलिब्रेशन करण्यात आलं. अरविंद केजरीवालांनी पत्नीला केक भरवतानाचा फोटोही समोर आला आहे.

‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. आप 62, तर भाजप 08 जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल हाती आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. पूर्ण बहुमत मिळालेल्या आम आदमी पक्षाचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे निश्चित आहे.

अरविंद केजरीवालांना 30 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार सुनिल कुमार यादव यांचा केजरीवालांनी पराभव केला. केजरीवाल यांना जवळपास 17 हजारांचं मताधिक्य मिळालं आहे. काँग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

दिल्ली काबीज करण्यासाठी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या त्रिकूटाचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

दिल्ली तो है हमारी, अब आई देश की बारी, ‘आप’चा नवा नारा

भाजपने तीनशे खासदारांसह 11 राज्यांतील मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उतरवलं होतं. महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्र्यांची फौजही प्रचारात उतरली होती. वीस वर्षांपासून सत्तेबाहेर असलेलं भाजप सत्ता मिळवण्यासाठी आसुसलं आहे.

2015 मध्ये ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत भाजप आणि काँग्रेसला क्लीन स्वीप दिला होता. भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा शून्य मिळवलं आहे. विशेष म्हणजे आप सत्तेत येण्यआधी काँग्रेस सातत्याने 15 वर्षे सत्तेत होतं.

Kejriwal Family Double Celebration